अर्जदार यांच्या विनंतीनुसार त्यांच्या जमिनीची मोजणीकरुन मुळ अभिलेखाच्या आधारे त्यांच्या शंका, वाद मिटविले जातात. या विभागाकडुन हद्द्कायम, पोटहिस्सा, बिगरशेती, भूसंपादन, कोर्टवाटप, कोर्टकमीशन, गुंठेवारी मोजणी केली जाते. तसेच अर्जदार यांनी भरणा केलेल्या मोजणी फ़ी नुसार नियमित, तातडी, अतितातडी, अतिअतितातडी या कालावधीच्या प्रकारात मोजणी केली जाते. दरवर्षी राज्यात साधारणपणे १,७५,००० मोजणी अर्जांची आवक होते. ई मोजणी पुर्वी अर्जामध्ये कार्यवाही कार्यालयातील कर्मचार्यांचे द्वारे केली जात असे. यामध्ये अर्जदार यांना मोजणीची तारीख मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागत. तसेच आपली मोजणी केव्हा होईल, मोजणीस कोण येईल, या बाबत कोणतीही माहिती अर्जदार यांना मिळत नव्हती. यासाठी ही खातेदारांना त्रास सोसावा लागत असे. या सर्वावर उपाय म्हणजे ई मोजणी होय. ई मोजणी आज्ञावलीमध्ये अर्जदार यांना घरबसल्या, सेतुकेंद्रातून खाजगी व्यावसायिक इंटरनेटच्या माध्यमातुन तसेच कार्यालयातुन मोजणीचा अर्ज भरता येतो. प्रस्तुत अर्जाचा टोकन क्रमांक व ७/१२ घेवून भूमि अभिलेख कार्यालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्ज भरुन घेण्याची संपुर्ण कार्यवाही पार पडली जाईल. मोजणी फी भरल्यानंतर आपला अर्ज कार्यालयात स्विकारला जाईल व तात्काळ आपल्या मोजणी प्रकरणाचा मोजणी रजिष्टर क्रमांक, मोजणीची तारीख, मोजणी कर्मचारी व त्यांचा मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती असलेली पोहोच अर्जदार यांना दिली जाईल.